दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारकडे एक अजब मागणी केली आहे. भारतीय चलनांमध्ये येणाऱ्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती आणि लक्ष्मीचाही फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. त्यामुळे सुख-समृद्धी येईल आणि संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वाद मिळेल. नव्या नोटांनी याची सुरुवात करता येईल, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.
ते पुढे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जात आहे, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भारत समृद्ध देश व्हावा, लोकांनी श्रीमंत व्हावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी अनेक पावले उचलावी लागतील. मोठ्या प्रमाणात रुग्णालये बांधावी लागतील, शाळा नव्याने उघडाव्या लागतील तसेच पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील.
I appeal to the central govt & the PM to put the photo of Shri Ganesh Ji & Shri Laxmi Ji, along with Gandhi Ji’s photo on our fresh currency notes, says Delhi CM & AAP national convenor Arvind Kejriwal pic.twitter.com/t0AWliDn75
— ANI (@ANI) October 26, 2022
पुढे ते म्हणाले की, आम्ही कोणाचेही फोटो हटवण्याची मागणी करत नसून, एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसऱ्या बाजुला लक्ष्मी- गणपतीचा फोटो असावा इतकंच म्हणणं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. देवाचा आशीर्वाद असेल तेव्हाच आपले प्रयत्न यशस्वी होतील, असे केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले की, अनेकवेळा असे घडते की, मेहनत करूनही फळ मिळत नाही. अशावेळी, देवाचे आशीर्वाद आवश्यक आहेत. जेव्हा देवतांचा आशीर्वाद असतो तेव्हा त्याचे परिणाम मिळू लागतात.
इंडोनेशियाचं उदाहरण देत केजरीवाल म्हणाले, तिथं 85 टक्के लोकसंख्या मुस्लीम धर्मीय असूनही त्यांच्या चलनांवर गणपतीचं चित्र/ फोटो आहेत. जर ते असं करु शकतात, तर आपण का नाही?