मेलबर्न : मेलबर्नमध्ये इंग्लंड आणि आयर्लंड (#IREvENG) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा 20 वा सामना खेळला गेला. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे आयर्लंडने हा सामना पाच धावांनी (Ireland win by 5 runs) जिंकला. बुधवारी (26 ऑक्टोबर) इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयर्लंडने 19.2 षटकात 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघाची धावसंख्या 14.3 षटकांत 5 बाद 105 असताना पाऊस आला.
AN HISTORIC WIN FOR IRELAND 🙌#T20WorldCup | #IREvENG pic.twitter.com/1M0QFY3Frq
— T20 World Cup (@T20WorldCup) October 26, 2022
डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे इंग्लंड पाच धावांनी मागे राहिला आणि त्यांना सामना गमवावा लागला. या स्पर्धेत आयर्लंडने दुसरा उलटफेर केला आहे. याआधी त्याने दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाला पहिल्या फेरीत नॉकआउट केले होते.
या सामन्यात इंग्लंडचे फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार जोस बटलर शून्यावर आणि अॅलेक्स हेल्स फक्त 7 धावावर बाद झाला. जोशुआ लिटलने दोघांनाही बाद केले. फिओन हँडने बेन स्टोक्सला 6 धावेवर क्लीन बोल्ड केले. 21 चेंडूत 18 धावा करून हॅरी ब्रूक जॉर्ज डॉकरेलचा बळी ठरला. डेव्हिड मलान 37 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. मॅकार्थीच्या चेंडूवर फिओन हँडने त्याचा झेल घेतला. मोईन अली 12 चेंडूत 24 धावा करून नाबाद राहिला. लियाम लिव्हिंगस्टोन एका धावेवर नाबाद राहिला.
आयर्लंडच्या संघाची एकवेळ 12 षटकांत 2 बाद 103 धावा अशी स्थिती होती. यानंतर संघाचे उर्वरित आठ फलंदाज फक्त 55 धावा जोडून पॅव्हेलियनमध्ये परतले. आयर्लंडकडून कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने सर्वाधिक 62 धावा केल्या. इंग्लंडकडून फिरकीपटू लियाम लिव्हिंगस्टोन आणि वेगवान गोलंदाज मार्क वुड यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.