नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या अभूतपूर्व विजयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. हि औपचारिक भेट असल्याचे बोलले जात आहे. हि बैठक अमित शहा यांच्या निवासस्थानी होणार आहे.
अरविंद केजरीवाल सध्या आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी सत्यंदर जैन, मनीष सिसोदिया, इम्रान हुसेन, गोपाळ राय, कैलाश गहलोत आणि राजेंद्र पाल गौतम यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर केजरीवाल अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची अमित शहा यांच्यासमवेत पहिली बैठक होणार आहे. मुख्यमंत्री दिल्लीतील काही मुद्द्यांबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या संबंधावर होऊ शकते चर्चा
2015 मध्ये आम आदमी पार्टीने दिल्लीत सत्ता स्थापन केल्यानंतर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संबंध ताणले गेले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेक मुद्द्यांवर पंतप्रधानांना लक्ष केले होते. या बैठकीत दिल्ली आणि केंद्र सरकारच्या संबंधांवर चर्चा होऊ शकते. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राबरोबर अधिक चांगल्या संबंधांची चर्चा केली होती.
दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीवर होणार चर्चा?
दिल्ली पोलिस गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने अमित शहा यांच्या भेटीत अरविंद केजरीवाल दिल्लीत वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करू शकतात. पूर्वीही आम आदमी पक्षाने दिल्लीतील गुन्हेगारीचा मुद्दा सातत्याने उपस्थित केले आहे. दरम्यान दिल्ली सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानात झाला होता.