वॉशिंग्टन – अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असल्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशवर दावा केले जाणे आणि नियंत्रण रेषेजवळ एकतर्फीपणे कोणत्याही भौगेलिक संरचनेमध्ये चीनकडून बदल केला जाण्याला अमेरिकेचा विरोध आहे.
बायडेन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशला दिलेल्या भेटीवर चीनने आक्षेप घेतला होता. त्यावर अमेरिकेच्या या अधिकाऱ्याने ही प्रतिक्रीया दिली आहे.
अरुणाचल प्रदेशला चीनने दक्षिण तिबेट असे मानून नेहमीच चीनचा भाग संबोधले आहे. शिझांग (तिबेट) चा दक्षिणेकडील भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशला देखील चिनी भाषेत झांगनान असे नाव देखील देण्यात आले आहे.
या भागावर भारताने अनधिकृतपणे ताबा मिळवलेला असून या अतिक्रमणाला चीनने कधीही मान्यता दिलेली नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल झ्यांग झियाओगांग यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते.
दिनांक ९ मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी अरुणाचलला भेट देऊन समुद्रसपाटीपासून १३ हजार फूट उंचीवर बांधलेल्या सेला बोगद्याचे उद्घाटन केले होते. या बोगद्यामुळे तवांग या दुर्गम भागातील संपर्क वाढण्यास मदत होणार आहे. तसेच सीमेवरील सैन्य दलाच्या हालचालीही या बोगद्यामुळे अधिक सुकर होणार आहेत.
अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग असल्याचे अमेरिकेला मान्य असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी दैनंदिन वार्तालापामध्ये सांगितले. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनकडून या भागामध्ये कोणत्याही भौगोलिक संरचनेमध्ये काहीही फेरबदल करण्याला अमेरिकेचा विरोध असेल, असे त्यांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेशवरील चीनचा दावा भारताने सातत्याने फेटाळून लावला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि भविष्यातही असेल, असे भारताच्याही परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी अनेकदा चीनला ठणकावून सांगितले आहे.
या भागाला चिनी भाषेतील नावे देण्याचा चीनचा उद्योग देखील भारताने बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अलिकडे केलेले दावे मर्खपणाचे असल्याचे भारताने म्हटले आहे.