पिंपरी, (प्रतिनिधी) – कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हाताने रेखाटली जाणारी कला मागे पडत चालली आहे. तरीही हताश न होता यश प्राप्तीसाठी कष्ट केलेच पाहिजेत. तंत्रज्ञान प्रगत झाले तरी कष्टाशिवाय पर्याय नाही. कला ही रियाज असते. पारंपरिक कलाकृतीला आधुनिकतेची जोड दिली पाहीजेत.असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भगवान रामपूरे यांनी व्यक्त केले.
आकुर्डी येथील डॉ डी वाय पाटील कॉलेज ऑफ़ अप्लाईड आर्ट ॲंड क्राफ्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनात चारशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचा समावेश होता.
रामपुरे यांनी ९० च्या दशकात साकारलेल्या बजाज जाहिरातीमधील चित्त्याची संकल्पना करताना व मुंबईस्थित शेयर मार्केटच्या वास्तु समोरील वळूची मूर्ती साकारल्यानंतर मिळालेल्या यशाचे रंजक कथन केले.
यावेळी माजी प्राचार्य मारुती पाटील, शैक्षणिक संकुलाचे वित्तीय अधिकारी बिपिनबिहारी शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य जयप्रकाश कलवले, यांनी विश्वस्त तेजस पाटील व शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम, वित्तीय अधिकारी बिपिन शर्मा यांच्या पाठिंब्याचा उल्लेख करून अध्यापक समुहाच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले.
यावेळी १२० पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा बहुमान कांचन चौसाळकर हिला प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक समन्वयक डॉ. नितीन तावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल वेलदोडे यांनी केले.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रा. शंकर आडेराव, प्रा. शरद वडकर, प्रा. पल्लवी पांढरे, प्रा. विवेक मगर, प्रा. समता बेंद्रे, प्रा. सुरभी गुळवेलकर , प्रा. इंद्रजित बंगाळे, प्रा. कृष्णा सावंत, प्रा. श्याम पगारे, प्रा. राजेश पुजारी, प्रा. विजयलक्ष्मी पिंजल, प्रा. प्रियंका खुंजिर, महादेव जगदाळे, अमेंद्र देशमुख, अमोल हरगुडे, जगन्नाथ चौघुले, दर्शना गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.