पुणे – दुष्काळाने होरपळणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) सहा जूनला केरळात आगमन होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. अंदमान निकोबार बेटसमुहावर 18 किंवा 19 मेपर्यंत मॉन्सून दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा सहा दिवस उशीराने मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून केरळातील आगमनानंतर देशातील पुढील वाटचाल ठरणार आहे.
“आयएमडी’ने मॉन्सूनच्या आगमनाचे पूर्वानुमान नुकतेच जाहीर केले. स्कायमेट पाठोपाठ आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने सुुद्धा मान्सूनला विलंब होणार असल्याचे जाहीर केल्याने चिंता वाढली आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मॉन्सून साधारण 20 मेपर्यंत अंदमान समुद्र आणि बेटांच्या दक्षिण भागात दाखल होतो. तर 1 जूनला केरळमधून मॉन्सूनचे देशात आगमन होते. “आयएमडी’कडून मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचे पूर्वानुमान 2005 पासून वर्तविण्यात येते.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात आलेल्या फणी चक्रीवादळामुळे बदलेले वाऱ्याचे प्रवाह सुरळीत होऊन मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती तयार होण्यासाठी कालावधी लागल्याने मॉन्सूनचे आगमन लांबण्याचे संकेत काही हवामान तज्ज्ञ व्यक्त करत होते. पूर्वमोसमी पावसासाठी आवश्यक स्थितीनुसार साधारण 21 एप्रिलदरम्यान केरळजवळच्या समुद्रात ढग जमा होऊन ते पूर्वेकडे सरकण्यास सुरवात होते. मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तविताना ही स्थिती विचारात घेतली जाते.
यंदा 10 दिवस उशिराने स्थिती निर्माण झाली असल्याने यंदा मॉन्सूनचे आगमन आठवडाभर लांबण्याची शक्यता वर्तविली जात होती. यातच मॉन्सून दाखल होण्यास उशीर होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. केरळमध्ये 6 जूनला मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर पाच दिवसांनी तो महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.