काबुल – अफगाणिस्तानमधून पळून गेलेले अध्यक्ष अशर्रफ घनी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात यावी, अशी मागणी अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान मोहंम्मदी यांनी इंटरपोलकडे केली आहे.
घनी यांनी आपली मातृभूमी विकून टाकली, असा घणाघात त्यांनी केला आहे. मातृभूमीचा अशाप्रकारे सौदा करणाऱ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात यावी आणि शिक्षा करायला हवी, असे मोहंम्मदी यांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मोहंम्मदी यांनी हॅशटॅग इंटरपोल अरेस्ट घनी नावाने एक अभियानच सोशल मीडियावर सुर केले आहे. बुधवारी ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तान दूतावासाने इंटरपोलला घनी यांना गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ताब्यात घेण्याची विनंती केली.
रविवारी तालिबानने काबुलमध्ये प्रवेश करून अफगाणिस्तानचा पूर्ण ताबा घेतला. त्याचवेळी घनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन हेलिकॉप्टरमध्ये रोख रक्कम भरून देशातून पलायन केले. ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेले असल्याचे वृत्त आहे.