श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या आई गुलशन नझीर यांची बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती चौकशी झाली.
गुलशन नझीर याआधी चौकशीसाठी हजर न राहिल्याने त्यांना ईडीकडून चौथ्यांदा समन्स बजावण्यात आले. अखेर त्या ईडीच्या श्रीनगरमधील कार्यालयात हजर झाल्या. त्यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली.
In New India being summoned by agencies like NIA & ED has become a ritual for whoever disagrees with GOIs divisive agenda & policies. In my mother’s case, the chronology is quite clear.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 18, 2021
आईसमवेत मेहबुबाही ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. मेहबुबा यांच्या नेतृत्वाखालील पीडीपीची जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता असताना मुख्यमंत्री निधीतून काही रक्कम काही जणांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा करण्यात आली. त्यामध्ये गुलशन नझीर यांच्या खात्यांचाही समावेश असल्याचे समजते.
त्याप्रकरणी ईडीने मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत याआधीच गुन्हा दाखल केला आहे. आईची चौकशी झाल्यानंतर मेहबुबा यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांना ईडी आणि एनआयएकडून समन्स बजावले जाण्याची प्रथाच पडली आहे. सरकारने सर्व यंत्रणांचे तालिबानीकरण केले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.