नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सुमारे 67 टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. त्याशिवाय, राज्यातील सर्वदूर भागांतून संपूर्ण आकडेवारी हाती येण्यास विलंबाची शक्यता असल्याने मतदानाची अंतिम टक्केवारी गुरूवारीच समजू शकेल. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत.
त्यासाठी एकूण 2 हजार 615 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांचे भवितव्य मतदारांनी बजावलेल्या हक्कामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या कर्नाटकचा निकाल 13 मे या दिवशी जाहीर होईल. मागील निवडणुकीत (वर्ष 2018) त्या राज्यात 72 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते.