नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला जाणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दिनांक 22 जून रोजी अमेरिकेच्या अध्यक्षांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या भोजन समारंभालाही मोदी उपस्थित राहणार आहेत.
भारत आणि अमेरिकेदरम्यानचे निकटचे संबंध अधिक दृढ करण्यावर या भेटीदरम्यान भर दिला जाणार आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात मुक्त, खुले, समृद्ध आणि सुरक्षित वातावरणाबरोबर दोन्ही देशांदरम्यानचे भागीदारीचे संबंध दृढ करण्यावरही यावेळी अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. शैक्षणिक आदान प्रदान, लोकांचा थेट संवाद यासह वातावरण बदल आणि आरोग्य सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरही यावेळी चर्चा होणे अपेक्षित आहे.