नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे रिपब्लिक टीव्ही आणि त्यांचे संपादक अर्णब गोस्वामी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा झटका बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने अर्णब गोस्वामीला तब्बल 20 हजार पौंड म्हणजे जवळपास 19 लाख 73 हजार रुपये दंड ठोठावला आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. रिपब्लिकचा युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे. प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.
6 डिसेंबरला रिपब्लिक भारतचा पूंछता है भारत कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत प्रसारणाच्या नियमांचें उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाकडून कारवाईची माहिती देत सांगण्यात आले आहे की, ऑफकॉमने चॅनेलला यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले असून पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याच्या सूचना केल्या आहेत.
ऑफकॉमने दिलेल्या माहितीनुसार, रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींनी भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेसंदर्भात कार्यक्रम करताना भारताच्या अवकाश तसेच तांत्रिक विकासाची पाकिस्तानशी तुलना केली होती. पाकिस्तानकडून भारताविरोध होणाऱ्या दहशतवादी कारवायांचाही त्यात उल्लेख होता. चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामी आणि सहभागी पाहुण्यांना केलेल्या कमेंट पाकिस्तानी लोकांविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या होत्या असे ऑफकॉमने सांगितले आहे. कार्यक्रमात वारंवार पाकिस्तानी नागरिकांचा उल्लेख दहशतवादी, माकडं, गाढवं, भिकारी आणि चोर असा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
पाकिस्तानचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, नेते सर्वजण दहशतावादी आहेत. त्यांचे खेळाडूदेखील तेथील प्रत्येक लहान मूल दहशतवादी आहे. तुम्ही दहशतवाद्यांविरोधात लढत आहात, असे अर्णब गोस्वामी यांनी कार्यक्रमात म्हटले होते असा उल्लेख ऑफकॉमने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. कार्यक्रमात पाकी शब्दाचा उल्लेख केल्याबद्दलही ऑफकॉमने आक्षेप नोंदवला आहे. हा वर्णद्वेषी शब्द असून युकेमधील नागरिकांना मंजूर नाही असे त्यांनी सांगितले आहे.