राज्य शासनाची मंजुरी : 10 एकर जागा राखीव
पुणे – महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करून महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
महापौर मोहोळ यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या महाविद्यालयाची संकल्पना मांडून निधीही उपलब्ध करुन दिला होता. हे महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय परिसरात साकारणार असून, त्यासाठी 10 एकर जागा राखीव करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्यसभेत गेल्या वर्षी 28 ऑगस्टला याला मंजुरी मिळाली. हा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला होता. त्याबाबत मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री-पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकास विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.
मुख्य सभेच्या मान्यतेनंतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत अहमदाबाद महापालिकेने साकारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर या संदर्भातील तांत्रिक बाबींची पूर्तता करत वेगाने पाठपुरावा केला.
महाविद्यालयात प्रत्यक्ष साकारताना विविध प्रवर्गातील 595 पदांची निर्मिती करून भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. येत्या सहा वर्षांत यासाठी टप्प्याटप्प्यात 622 कोटी रुपयांची आवश्यकता असणार आहे, आणि त्या निधीची प्रत्येक वर्षी तरतूद केली जाणार आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर