सासवड -सासवड शहर व जवळार्जुन गावात बुधवार (दि.27) दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जवळार्जुनमधील एकाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे सुपे, सासवड, जवळार्जुन येथील तीनही रुग्ण हे पुण्यातील एका खासगी कंपनीत कर्मचारी आहेत. प्रशासन अलर्ट झाले आहे.
सासवड व जवळार्जुन येथील बाधित पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करतात. यापूर्वी या कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कंपनीने संपूर्ण कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यात सुपे येथील पहिला बाधित सापडला. त्यानंतर खासगी रुग्णालयात अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय रुग्णालयात तपासणी केली असता कंपनीतील सासवड, जवळार्जुन येथील आणखी दोन कर्मचारी बाधित झाल्याचे आढळले. तसेच कोडीत येथील कुटुंब मंबुईवरून आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील बाधितांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
दरम्यान, वीर, सुपे, कोडीत, जवळार्जुन, सासवड याठिकाणी रुग्ण आढळल्याने ही सर्व गावे सील करण्यात आली आहेत. या गावात कॅटेन्मेंट झोन घोषित केला आहे. आजूबाजूचा पाच किलोमीटरच्या परिसरात बफर झोन घोषित केला आहे. गावातून नागरिकांना बाहेर येण्यास व जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवांची दुकाने चालू ठेवण्यात आली आहेत. इतर सर्व दुकानेही बंद केली आहेत.
तहसीलदार रूपाली सरनोबत म्हणाल्या की, पुरंदर तालुक्यात रुग्णांची संख्या पाच झाली असून सध्या सासवड येथे वाघिरे महाविद्यालय येथे ट्रिपल सेंटर सुरू करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे याठिकाणी क्वारंटाइन केले जात आहे.
जेजुरीला पहिल्या टप्प्यातच दिलासा
पुरंदर तालुक्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर जेजुरीमध्ये पहिला करोना रुग्ण आढळला. त्यानंतर त्या रुग्णाचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची शासकीय तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे जेजुरीकरांना पहिल्या टप्प्यातच दिलासा मिळाला आहे.