पिंपरी – शाश्वत विकासासाठी नागरी सहभाग आणि समाधान महत्वाचे असून नागरिकांच्या संकल्पनांमधून शहराची जडणघडण उत्तम पद्धतीने होत असते, असे प्रतिपादन पोलंडचे भारतातील सहाय्यक महावाणिज्य दूत डॅमियन इरझिक यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहरातील माहिती आणि तंत्रज्ञान, संस्कृती त्याचबरोबर औद्योगिक व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी आज डॅमियन इरझिक यांनी शहराला भेट दिली त्यावेळी बोलत होते. महापौर माई ढोरे यांनी डॅमियन इरझिक यांचे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये स्वागत केले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, नगरसेविका सिमा सावळे, आशा शेंडगे-धायगुडे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर ढोरे आणि डॅमियन इरझिक यांच्यामध्ये महाराष्ट्रीयन संस्कृती आणि पोलंड देशातील संस्कृती तसेच शहरातील प्रकल्पांबद्दल चर्चा झाली. पोलंड आणि महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक संदर्भांना यावेळी इरझिक यांनी उजाळा दिला. ते म्हणालडे, पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने होत असलेला विकास प्रशंसनीय आहे. पोलंडमधील शहरांच्या तुलनेने पिंपरी चिंचवड शहर लोकसंख्या, क्षेत्रफळ आदींबाबत मोठे असून देखील महापालिकेमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे व्यवस्थापन उत्तम आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि पोलंड देशातील महत्वाच्या शहरांमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान, संस्कृती त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणूक आदींबाबत आदानप्रदान करण्यासाठी सिस्टर सिटी सामंजस्य करार करण्याचा मानस आहे.
दरम्यान, आयुक्त राजेश पाटील आणि डॅमियन इरझिक यांच्यामध्ये शहरातील नियोजित विकासकामे, स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेले विविध प्रकल्प आणि भविष्यातील शहराचे नियोजन आदी बाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी तथा स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते. संगणकीय सादरीकरणाद्वारे पिंपरी चिंचवड शहराच्या नगरपरिषद ते स्मार्ट सिटी पर्यंतच्या प्रवासाबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. गुंतवणुकीसाठी शहरामध्ये पालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत देखील यावेळी इरझिक यांना माहिती देण्यात आली.