नवी दिल्ली – केंद्र सरकारने मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तपदांवरील नियुक्त्यांच्या संबंधात कार्यवाही सुरू केली आहे. तथापि, यात माहिती आयुक्त म्हणून पत्रकार उदय माहुरकर यांची नियुक्ती केली जाणार असल्याच्या वृत्ताला कॉंग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे.
या संबंधात कॉंग्रेसने म्हटले आहे की, माहिती आयुक्त पदासाठी जे अर्ज सादर झाले आहेत, त्या 355 अर्जात माहुरकर यांचा अर्ज प्राप्त झालेला नाही. या पदासाठी जी नावे शॉर्टलिस्टेड करण्यात आली होती, त्यातही माहुरकर यांच्या नावाचा समावेश नव्हता. पण आता मात्र अचानक आकाशातून टपकल्यासारखी माहुरकर यांची नियुक्ती सरकारकडून केली जात आहे.
ते सरकारची तळी उचलणारे पत्रकार आहेत म्हणूनच त्यांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती केली जात असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, माहुरकर हे सरकारचे खुले समर्थक आहेत.
दरम्यान, मुख्य माहिती आयुक्त म्हणून विदेश सेवा विभागातील निवृत्ती अधिकारी यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यांनाही अशा स्वरूपाच्या कामाचा अनुभव नाही, असा आक्षेप चौधरी यांनी घेतला आहे. या नव्या नियुक्त्यांच्या संबंधात राष्ट्रपती भवनातून लवकरच अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे उमेदवार निवडले आहेत.