चीनच काढायला सांगत आहे ॲप!
नवी दिल्ली – चिनी ॲपविरोधात नकारात्मक वातावरण तयार झाले असताना चीन सरकारच ॲपलच्या ॲप स्टोअरमधील चिनी ॲप काढण्यास सांगत आहे. चीन सरकारने ॲपलच्या ॲप स्टोअर स्टोअरला चीनमधील 4,500 गेमिंग ॲप काढण्याची सूचना केली.
त्यानुसार ही गेमिंग ॲप ॲपलने आपल्या स्टोअरवरून काढून टाकली आहेत. चीन सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये चीनमधील 3,000 गेमिंग ऍप काढून टाकण्यात आली. एवढ्या मर्यादित कालावधीत एवढी ॲप काढून टाकण्याची घटना प्रथमच घडली आहे.
याबाबत असे कारण सांगितले जाते की, चीन सरकारच्या परवानगीशिवाय ही ॲप अपलोड करू नये, असा नियम आहे. मात्र चीन सरकारच्या परवानगीशिवाय बरीच ॲप अपलोड करण्यात आली होती. चीनमध्ये सरकारची परवानगी घ्यायला एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ॲप निर्मात्यांनी परवानगी न घेताच ही ॲप अपलोड केली होती. चीन सरकारने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आणखी 20 हजार ॲपवर परिणाम होऊ शकता. सध्या ॲपलच्या ॲप स्टोअरवर चीनमधील 60,000 गेमिंग ॲप आहेत.