मॉस्को – युक्रेन युद्धाबद्दल चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपाखाली रशियाने ऍपल आणि विकिपिडीयाला दंड ठोठावला आहे. ऍपलला 4 लाख रुबल (4,400 डॉलर) इतका तर विकिपिडीया फाउंडेशनला 3 दशलक्ष रुबल (33 हजार डॉलर) इतका दंड ठोठावला गेला आहे.
युक्रेन युद्धाबाबतची ऍपलने आपल्या पॉडकास्ट आणि ऍपवरून आणि विकिपिडीयाच्या रशियन भाषेतील वेबपेजवरून उपलब्ध करून दिलेली माहिती खोटी असून ती हटवली न गेल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे.
प्रशासकीय उल्लंघनाची प्रकरणे हाताळणाऱ्या शांतता न्याय विभागाच्या न्यायालयाने ऍपल आणि विकिपिडीया फाउंडेशनला दोषी ठरवले असून हा दंड आकारला आहे, असे रशियातील वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यापासून, रशियाने लष्करी मोहिमेवर कोणतीही टीका किंवा प्रश्न विचारल्यास शिक्षा करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. काही टिकाकारांना कठोर शिक्षाही झाल्या आहेत.
विरोधी नेते व्लादिमीर कारा-मुर्झा यांना युक्रेनमधील रशियाच्या आक्रमणाविरुद्ध केलेल्या भाषणांमुळे देशद्रोहाच्या आरोपाखाली 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.