पिंपरी -दिघी-आळंदी बीआरटी मार्गावरील चोवीसावाडी बसथांब्यालगतची जागा महापालिकेच्या ताब्यात तब्बल आठ वर्षांनंतर आली आहे. पोलीस बंदोबस्तात ही जागा महापालिकेच्या बीआरटी विभागाने ताब्यात घेतली आहे. या मार्गाच्या बसथांब्यांवरील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी या थांब्यांवर सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी पत्राद्वारे पीएमपी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
आळंदी-पुणे बीआरटी मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बॅरीकेटस्चे व बसथांब्यांचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर मॅगझीन चौक, मोझे स्कूल, साईनगर, ताजणे मळा, गोखले मळा, वडमुखवाडीफाटा, चोवीसवाडी फाटा, चऱ्होली फाटा, पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस या नऊ ठिकाणी बस थांबे उभारण्यात आले आहेत. तर काळे कॉलनीचा थांबा प्रलंबित आहे. तसेच तांत्रिक कामांची पूर्तता करणे बाकी आहे. दरम्यान, चोविसावाडी येथील बसथांब्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आळंदी-पुणे बाजुची 30 मीटर रुंद 100 मीटर लांब जागा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
सहा वर्षे हा वाद सुरु होता. तर गेली दोन वर्षे करोना प्रादुर्भावामुळे या मार्गाकडे दुर्लक्ष झाले होते. तर पुणे महापालिका हद्दीतील साठे बिस्किट कंपनीपासून बीआरटी कॉरीडॉर सुरू असून, चोविसावाडी येथील जमिनीचे संपादन रखडल्याने हा मार्ग प्रलंबित राहिला होता. त्यामुळे हा मार्ग सुरू करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात चोविसावाडी येथील जागा ताब्यात घेऊन, त्याठिकाणचा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे.
जागा मालकाकडून होत असलेली अडवणूक व न्यायालयीन बाबींवर महापालिका कायदा सल्लागारांचे लेखी अभिप्राय घेण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्तालयाकडून बंदोबस्त घेतल्यानंतर ही जागा ताब्यात घेऊन, त्याठिकाणी रस्ता तयार करण्यात आला आहे. बसथांब्यांवरील तांत्रिक कामे पूर्ण केल्यानंतर या मार्गावर बससेवा सुरु करण्याचे नियोजन आहे.
-एस. डी. साळी, उपअभियंता,बीआरटी विभाग