मुंबई – प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. नुकतेच ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. त्यानंतर आता लवकरच ते एक वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
अनुपम खेर रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचा हा 538 वा चित्रपट असणार आहे. आगामी चित्रपटाचा लुक शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘गुरुदेवांना पडद्यावर साकारण्याचे सौभाग्य मिळाले हे माझे भाग्य आहे! या चित्रपटाची अधिक माहिती लवकरच तुमच्यासोबत शेअर करू!’ या पोस्टला त्यांनी रवींद्रनाथ टागोर हा हॅशटॅग देखील दिला आहे. अनुपम खेर यांच्या या आगामी चित्रपटामधील हा लुक अनेकांच्या पसंतीस पडले आहे.
View this post on Instagram
एका नेटकऱ्याने फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘तुम्ही हुबेहूब गुरुदेवांसारखे दिसत आहात, हा सिनेमा कधी येणार आहे?’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत.’ या चित्रपटाचे नाव अद्याप सांगण्यात आलेले नाही. याशिवाय यात कोणकोणते कलाकार काम करणार आहेत? याबाबत देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, अभिनेते अनुपम खेर यांना तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत आहे. या काळात आपण त्यांना बाप, खलनायक किंवा कॉमेडी यांसारख्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. यानंतर आता ते आणखी एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अनुपम ‘विजय 69’ या चित्रपटात देखील दिसणार आहेत.