बलात्कारानंतर पेटवलेल्या आणखी एका महिलेचा मृत्यू

पंचायतीच्या निर्णयानंतर स्वतःच पेटवून घेतल्याचाही दावा

कानपूर : बलात्कारानंतर पेटवलेल्या आणखी एका महिलेचा आज मृत्यू झाला. फतेहपूरमध्ये या 18 वर्षे वयाच्या तरुणीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिला पेटवून देण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असे तिच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यातल्या या घटनेनंतर पोलिसांनी बलात्कार आणि खुनाच्या प्रयत्नांशी संबंधित कलमांखाली “एफआयआर’ नोंदविला होता, परंतु एका नातेवाईकांसोबतचे संबंध एका ग्रामपंचायतीने संपवल्यानंतर तिने स्वत: ला पेटवून घेतले, असाही दावा केला जात आहे. पोलीस या दाव्याचीही चौकशी करीत आहेत.

“संबंधित तरुणी गंभीररितीने भाजल्यामुळे तिचे फुफ्फुस आणि मूत्रपिंड आदी अवयव निकामी झाले होते. आम्ही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती जगू शकली नाही.’ असे तिच्यावर उपचार करणाऱ्या सर्जरी विभागचे प्रमुख डॉ. संजय काला यांनी सांगितले.

90 टक्क्‌यांहून अधिक भाजलेल्या बलात्कार पीडित मुलीला मंगळवारपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र एकापाठोपाठ एक अवयव निकामी होत गेल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. तिला श्‍वसनासही त्रास होत होता. बुधवारी रात्रीपासून ती बेशुद्धावस्थेत होती. अखेर आज संध्याकाळी तिने अखेरचा श्‍वास घेतला, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यातल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला होता आणि बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती फतेहपूरचे पोलीस अधिक्षक प्रशांत वर्मा यांनी दिली.

पंचायतीचा निकाल
या तरुणीचे एका नातेवाईकाबरोबर असलेले संबंध उघड झाल्यावर पंचायत बोलावण्यात आली. या पंचायतीने हे संबंध अमान्य केल्यावर तरुणी आणि संबंधित पुरुषाला एकमेकांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घ्यायला लावले गेले. त्यानंतर या तरुणीने स्वतःला पेटवून घेतले होते, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक (अलाहाबाद विभाग) सुजित पांडे यांनी पूर्वी सांगितले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.