लखनौ – उत्तर प्रदेशच्या बरेली (UP Crime) जिल्ह्यात आणखी एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. साडीने गळफास देउन तिची हत्या करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांत महिलांची अशा प्रकारे हत्या करण्याची ही नववी घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. (Bareli News)
जगदीशपूरची उर्मिला देवी (वय ५५) ही महिला रविवारी दुपारी जनावरांसाठी चारा आणण्याकरता शेतात गेली होती. बराच उशीर झाल्यावरही ती घरी परत न आल्याने सायंकाळी तिची शोधाशोध सुरू करण्यात आली.
बराच वेळ शोध घेतल्यानंतर तिचा पती वेद प्रकाश गंगवार याला एका शेतात तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जखम होती आणि साडीने तिला फास देण्यात आला होता, तिची जीभही बाहेर आली होती असे पाेलिसांनी सांगितले.
गेल्या पाच महिन्यांत सातत्याने अशा घटना घडत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रचंड खळबळही निर्माण झाली आहे. या प्रकरणांच्या तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.