- कान्हे फाटा येथील 20 खाटांचे युनिट स्थापन करण्यास मान्यता
- आता ग्रामीण रुग्णालयाऐवजी 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार
मावळ – रस्ते अपघातातील जखमींवर “गोल्डन अवर’मध्ये प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा आता वडगाव मावळ (कान्हे) येथे “ट्रॉमा केअर सेंटर’च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यापूर्वी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील सोमाटणे टोल नाक्याच्या बाजूला ओझर्डे हद्दीत ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्यामुळे आता मावळ तालुक्यात दुसरे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अपघातग्रस्तांचा जीव वाचण्यास मोठी मदत होणार आहे.
अपघातांची वाढती संख्या आणि बळींची संख्या विचारात घेता 2014 मध्ये पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचा संकल्पना पुढे आली. द्रुतगतीवरील अपघातांची पार्श्वभूमी लक्षात घेता अपघातग्रस्तांना तातडीने प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा निर्माण करण्याची गरज होती. त्यातून ओझर्डे गावच्या हद्दीत एमएसआरडीसी, आरोग्य विभाग, एसजी डायग्नोस्टिक आणि पवना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दीड वर्षापूर्वी ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्यामुळे ट्रॉमा केअर युनिटमुळे अपघातग्रस्त नागरिकांना पहिल्या तासात (गोल्डन अवर) योग्य उपचार मिळाले, जेणेकरून त्यांचे प्राण वाचविण्यात मदत झाली.
आता मावळ तालुक्यातील वडगाव मावळ (कान्हे) येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय 20 खाटांच्या ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे “या’ ट्रॉमा केअरच्या निर्मितीनंतर जखमींवर प्राथमिक उपचार करून आवश्यकता भासल्यास तिथून जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये जखमींना नेण्यात येईल.
भविष्यात हे ट्रॉमा केअर सेंटर 24 तास सुरू राहणार असून, तेथे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, औषधे, प्राथमिक उपचारासाठी छोटे शस्त्रक्रिया गृह, कार्डिअक ऍम्ब्युलन्स, शीघ्र प्रतिसाद वाहन (क्यूआरव्ही) अशा व्यवस्था मिळतील, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वडगाव मावळ (कान्हे) येथील नव्याने करण्यात येणाऱ्या 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटरसाठी जागा अधिग्रहित करून तेथे बांधकाम व पदनिर्मिती करण्याबाबतची स्वतंत्र कार्यवाही करण्यात येईल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.