कोल्हापूर – बुली बाई नावाने गिटहब नावाच्या ऑनलाईन ऍपवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबत धागे दोरे हाती लागले असून लवकरच या प्रकरणाचा पर्दाफाश करू, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. याबाबत सायबर सेललाही चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सतेज पाटील म्हणाले, एका अज्ञात गटाकडून गिटहब ऍपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करण्यात येत असून त्यांना टार्गेट केले जात आहे. याची दखल राज्याच्या गृह खात्याने घेतली असून याबाबत सायबर सेलला चौकशीचे आदेश देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
बुली बाई नावाने ऍपवर शनिवार, 1 जानेवारी रोजी काही आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यात आले आहेत. या प्रकरणाबाबत धागेदोरे हाती लागले आहेत. मात्र, तपास सुरु असल्याने आपण आताच काही बोलणार नाही. परंतु लवकरच याचा पर्दाफाश करू, असे त्यांनी म्हटले आहे.