भोपाळ -काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची सत्ता गमवावी लागलेल्या कॉंग्रेसला गुरुवारी आणखी एक हादरा बसला. पक्षाचे त्या राज्यातील आमदार नारायण पटेल यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत तसे पाऊल उचलणाऱ्या कॉंग्रेस आमदारांची संख्या 3 इतकी झाली आहे.
तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्चमध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे समर्थक असणाऱ्या 22 आमदारांनी तसेच पाऊल उचलत आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे कॉंग्रेसला मध्य प्रदेशच्या सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यातून भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला.
सत्ता गमावल्यानंतर कॉंग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. सुमारे 15 महिने मध्य प्रदेशात सत्तेवर राहिलेल्या कॉंग्रेसचे संख्याबळ घटून 89 झाले आहे. मध्य प्रदेश विधानसभेचे एकूण संख्याबळ 230 आहे.
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या 25 आमदारांचे राजीनामे आणि 2 आमदारांचा मृत्यू यामुळे विधानसभेचे संख्याबळ 203 पर्यंत खाली आले आहे. सत्तारूढ भाजपचे 107 आमदार आहेत. आता विधानसभेच्या 27 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.