जयपूर – केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गजेंद्रसिंह शेखावत राजस्थानमधील एका पतसंस्थेतील घोटाळ्यात सामील असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यावरून येथील न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
राजस्थानच्या संजीवनी पतसंस्थेतील घोटाळ्यामुळे हजारों गुंतवणूकदारांचे तब्बल 900 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्या घोटाळ्यात शेखावत आणि त्यांच्या पत्नी सामील असल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे शेखावत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये सध्या सत्तासंघर्ष सुरू आहे. राज्यातील सरकार पाडण्यासाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये शेखावत सामील असल्याचा आरोप सत्तारूढ कॉंग्रेसकडून केला जात आहे. राजस्थानमधील राजकीय उलथापालथींची चौकशी पोलिसांच्या विशेष गटाकडून (एसओजी) केली जात आहे.
कॉंग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी शेखावत प्रयत्नशील असल्याचा दावा करत राजस्थान सरकारने त्यांच्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. त्यावरून एसओजीने याआधीच चौकशीसाठी शेखावत यांना नोटीस बजावली आहे. अशातच पतसंस्था घोटाळ्याचे प्रकरण पुढे आले आहे.