SatyaPal Malik: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी घरावर सीबीआयची छापेमारी सुरू झाली आहे. याशिवाय मलिक यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी हे छापे मारण्यात आले आहेत. मुंबईसह देशभरातील 30 ठिकाणी सीबीआयने एकाचवेळी रेड टाकल्याची माहिती समोर आली आहे. किरू हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी 2019 मध्ये 2200 कोटींच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकल्पाची फाईल त्यांच्याकडे आली होती. ही फाइल मंजूर करण्यासाठी तब्बल 300 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी सीबीआयने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीनकुमार चौधरी, माजी अधिकारी एम.एस. बाबू, एमके मित्तल आणि अरुणकुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सत्यपाल मलिक ट्वीट – त्यानंतर पुन्हा एकदा सत्यपाल मलिक यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयकडून छापेमारी सुरू करण्यात आली. त्यानंतर सत्यपाल मलिक यांनी ट्वीट करत मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही,’ असे म्हंटले आहे. “मी गेल्या ३-४ दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. असे असतानाही सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर हुकूमशहाकडून छापे टाकले जात आहेत. माझा ड्रायव्हर आणि माझा सहाय्यक यांच्यावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.” सत्यपाल मलिक रुग्णालयात दाखल असताना त्यांच्यावर हे छापे टाकण्यात आले आहेत. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. दरम्यान, मलिक 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. 2022 पासून या प्रकरणाची चौकशी सुरू असून मलिक यांचीही यापूर्वी चौकशी करण्यात आली आहे. मात्र, आज सीबीआयने पहिल्यांदाच एकाचवेळी देशभरातील 30 ठिकाणी छापेमारी केली आहे. 2023 मध्ये सीबीआयनं अशाच पद्धतीने 12 ठिकाणी छापेमारी केली होती. किरू प्रकल्प किश्तवाडपासून ४२ किलोमीटर अंतरावर आहे. 20 एप्रिल 2022 रोजी जम्मू-काश्मीर सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे करण्याची मागणी केली होती.