पुणे – राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सन २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या आणि परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना करोनाच्या प्रादुर्भावच्या कालावधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या आणि जे विद्यार्थी त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, अशा एमबीबीएस विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची एक अतिरिक्त संधी (पाचवा अटेंम्प्ट ) करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर प्रसिध्द केले आहे.
दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेनमधील परदेशी वैद्यकीय पदवीधरांना एक वेळची संधी म्हणून विविध देशांमधून त्यांचे उर्वरित वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. तसेच, ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, अशा परदेशी वैद्यकीय पदवीधरांना नोंदणीसाठी सक्षम करण्यासाठी दोन वर्षांसाठी अनिवार्य फिरती वैद्यकीय इंटर्नशिप घेणे आवश्यक आहे, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.