पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहिले आहेत. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना थेट डीबीटीचा लाभ मिळालेला नाही. खात्यावर रक्कम कधी जमा होणार असा सवाल पालक उपस्िथत करत आहेत. शिक्षण विभागाच्या धीम्या कार्यवाहीचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी साहित्य खरेदी करून त्यांची बिले जमा करणे अनिवार्य आहे. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक मिळून ५० हजार ८६० एकूण विद्यार्थी संख्या आहे. यापैकी २०२३-२४ हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत ४५ हजार ९१९ (डीबीटी) विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
पण प्रत्यक्षात फक्त २० हजार ४८८ साहित्य खरेदीची बिले प्राप्त झाली आहेत. म्हणजेच कित्येक विद्यार्थी पैसे मिळूनही अद्याप शैक्षणिक साहित्यापासून वंचित असण्याची शक्यता अधिक आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये ४१ हजार ६०० आणि माध्यमिक शाळेत एक हजार २६० विद्यार्थी आहेत. महापालिकेच्या नवीन नियमानुसार थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रक्रियेद्वारे दप्तर, शूज-मोजे, वह्या, व्यावसायिक पुस्तके, कंपास पेटी, रेनकोट, वॉटर बॉटल, फुटपट्टी, चित्रकला वही, प्रयोग वही, भूगोल वही व नकाशे इत्यादी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत आहेत.
गतवर्षीपासून महापालिकेने डीबीटी या प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रोख देण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी २०२३- २४ या शैक्षणिक वर्षात सुरुवात झाली. मात्र, शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना डीबीटीचा लाभ मिळाला नाही.