पुणे – सारसबाग चौपाटीवर फुड प्लाझा विकसित केला जाणार आहे. हा फूड प्लाझा दोन मजली असणार असून त्यासाठी १८ कोटी ५० लाखांच्या खर्चास महापालिकेच्या एस्टीमेट समितीत नुकतीच मान्यता देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेकडून या मागील महिन्यातच या प्लाझाच्या सुधारित आराखडयास मान्यता देण्यात होती.
मात्र, त्यानंतर महापालिकेच्या भवन विभागाच्या अधिकार्यांनी नुकतीच गुडगाव येथील दोन मजली प्लाझाची पाहणी केल्यानंतर सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, याचा खर्च दुपटीने वाढला आहे. या पूर्वीचा आराखडा ८ कोटी रूपयांचा होता. या ठिकाणी सध्या 53 स्टॉल असून प्लाझा दुमजली केल्याने आता ही संख्या ९० ते १०० च्या दरम्यान असणार आहे.
तर सारसबागेची सीमाभिंत आणि सणस मैदान सीमा भिंतीदरम्यान खाऊ गल्ली, नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक रचना, सुशोभीकरण, विविध कलाकृती सादर करण्यासाठीचे छोटेखानी मंच करण्याचे नियोजन आहे.सध्या चौपाटीसमोरील रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर होतो. फुड प्लाझा करताना येथील रस्ता बंद करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.