Congress Candidate List| लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी आणखी एक उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने या यादीत 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये राजस्थानमधील दोन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. परंतु यात काँग्रेसने राजस्थानमधील राजसमंद आणि भिलवाडा मतदारसंघातील उमेदवार बदलले आहेत.
कोणत्या उमेदवाराला मिळाली संधी?
काँग्रेसकडून राजसमंद लोकसभा मतदारसंघातून सुदर्शन रावत यांच्या जागी दामोदर गुर्जर यांना तिकीट देण्यात आले आहे. तर भिलवाडा मतदारसंघातून दामोदर गुर्जर यांच्या जागी डॉ.सी.पी.जोशी यांना तिकीट देण्यात आले आहे. या यादीत कर्नाटकातील लोकसभेच्या तीन जागांसाठीच्या उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
याआधी काँग्रेसने भीलवाडा मतदारसंघातून दामोदर गुर्जर यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. मात्र नव्या यादीत दामोदर गुर्जर यांची जागा बदलण्यात आली आहे. आता त्यांना राजसमंद येथून तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्या जागी भिलवाडामधून सीपी जोशी यांना तिकीट देण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसने राजस्थानमधील सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी दोन जागांचे उमेदवार बदलण्यात आले आहेत. यासह आता राजस्थानमधील सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
नुकतेच राजसमंद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुदर्शन सिंह रावत यांनी निवडणूक न लढवण्याबाबत मतभेद व्यक्त करत पक्षाला तिकीट परत केले होते. या घटनेने काँग्रेसची मोठी बदनामी झाली आहे. यावर पक्षाने भिलवाडा येथील उमेदवार दामोदर गुर्जर यांना राजसमंद जागेवर हलवले आहे.
तर दामोदर गुर्जर यांच्या जागी काँग्रेसने सीपी जोशी यांना भिलवाडामधून ब्राह्मण चेहरा उभा केला आहे. 2009 मध्ये भिलवाडामधून खासदारकीची निवडणूक जिंकून सीपी जोशी केंद्रात पंचायत राज आणि परिवहन मंत्री बनले. मात्र, सीपी जोशी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. पण पक्षाच्या हायकमांडने समजावून सांगितल्यानंतर ते भिलवाडामधून निवडणूक लढवण्यास तयार झाले.
26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान
राजस्थानमध्ये दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून (२८ मार्च) सुरू झाली आहे. आतापर्यंत 10 उमेदवारांनी 20 अर्ज सादर केले आहेत. लोकसभेच्या पाच जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही. लोकसभेच्या 13 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
हेही वाचा:
बिहारमध्ये ‘महागठबंधन’चे जागा वाटप फायनल; कॉंग्रेसच्या वाट्याला 9 जागा