न्यूयॉर्क – अमेरिकेच्या ओहियो येथे शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा काल रात्री मृत्यू झाला. उमा सत्य साई गड्डे असे याविद्यार्थ्याचे नाव असून त्याचा मृत्यू गूढ आणि संशयास्पद असल्याचे भारताच्या अमेरिकेतील दुतावासाने म्हटले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून कशामुळे त्याचा मृत्यू झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
उमा साई हा भारतीय वंशाचा तेलगु विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत होता. ओहियोच्या क्लीव लँड येथील एका कॉलेजात त्याने प्रवेश घेतला होता. त्याच्या अकस्मात मृत्यूबद्दल भारतीय दुतावासाने शोक व्यक्त केला आहे व त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती कळवण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूच्या घटना घडत आहेत. आता उमा साईच्या मृत्यूमुळे अशा प्रकारे मरण पावलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १० झाली आहे. मार्च महिन्यात क्लीव लँड येथूनच मोहम्मद अब्दुल अराफत हा भारतीय विद्यार्थी बेपत्ता झाला होता.
त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून खंडणीची मागणी करण्यात आली होती. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र अलिकडच्या या घटनांमुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.