पुणे –समाजमाध्यमाद्वारे पुरुषांना जाळ्यांत ओढून त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतील तरुणीविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात तीने तरुणाशी इन्स्टाग्रामवरून ओळख वाढविली. त्याच्याशी शरीरसंबंध ठेवत इतर आरोपींच्या मदतीने त्याच्याकडून 20 लाख उकळल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तरुणीला अटक केली. सहायक सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने तीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत 20 वर्षीय युवकाने फिर्याद दिली. त्यानुसार 19 वर्षीय युवतीसह दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात यापूर्वी पाच जणांना अटक केली आहे. 15 ते 20 ऑक्टोबर 2020दरम्यान ही घटना घडली. तरुणीस पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील निलेश लडकत यांनी केली होती.