मुंबई – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. यातच मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेता किरण कुमार यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
किरण कुमार यांनी सांगितले की,“मी १४ मे रोजी करोनाची चाचणी केली होती. त्यानंतर आलेल्या रिपोर्टसमध्ये मला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र माझ्यात करोनाची कोणतीच लक्षणं दिसून आली नव्हती. ताप, सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास कोणतीही समस्या मला जाणवत नव्हती. मी पूर्णपणे व्यवस्थित होतो. परंतु तरी मला करोना झाला आहे.त्यामुळे मी घरातच क्वारंटाइन झालो आहे. माझं घरं दुमजली असल्यामुळे मला घरात राहण्यास कोणतीच अडचण येत नाहीये”, असं ते म्हणाले.
दरम्यान, किरण कुमार यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तत्पूर्वी, कनिका कपूर, चित्रपट निर्माते करीम मोरानी, त्यांच्या दोन्ही मुली, अभिनेता पूरब कोहली, फ्रेडी दारुवालाचे वडील,सत्यजीत दुबे यांची आई अशा काही सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती.