मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमरदारांसह बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच झाली. त्यानंतर आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या आता शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी निलम गोऱ्हे यांच्यासोबत दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत.
नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे काही आमदारांनी उपसभापती असून देखील आमदारांना त्या बोलू देत नाही अशी तक्रार केली होती. यावरून त्यांना उद्धव ठाकरे यांनी खडेबोल सुनावल्याचेही बोलले जात आहे. यानंतर त्यांचे नाराजीनाट्य सुरु झाले आणि शिंदे गटासोबत त्यांची जवळीक वाढल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता निलम गोऱ्हे शिंदे आज अखेर शिंदे गटात जाणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे. याशिवाय युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाची गळतीचे सत्र सध्या सुरूच असल्याचे यातून दिसत आहे.
कोण आहेत निलम गोऱ्हे?
नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. आतापर्यंत तीन वेळा त्या विधानपरिषदेवर निवडून आल्या आहेत. 2005 मध्ये त्या शिवसेना उपनेत्या होत्या. 2007 मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्या, 2010 मध्ये त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही काम केले आहे.