पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे सुमारे 1,500 आयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात आली असून, आठवडाभरात हे सगळे आयसोलेशन सेंटर्स कार्यान्वित होणार आहेत.
येरवड्यातील संत ज्ञानेश्वर शाळेत आणि हडपसरमधील बनकर शाळेतील कोविड केअर सेंटर बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येकी तीनशे बेडच्या क्षमतेच्या या केंद्रांमध्ये सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या करोनाबाधितांना उपचार दिले जाणार आहेत.
याशिवाय गुरूवातपासून गंगाधाम अग्निशमन केंद्राच्या इमारतीत 200 बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे, तर येत्या सोमवारपासून येरवड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या इमारतीतील आणि बालेवाडी “निकमार’येथील 300 बेड क्षमतेची कोविड केअर सेंटर सुरू केली जाणार आहेत. जम्बो रुग्णालयातील बेडची संख्याही वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आठवडाभरात पंधराशेहून अधिक खाटा करोनाबाधितांवरील उपचारांसाठी सज्ज होतील, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.
रुग्णांवरील उपचारांसाठी महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात बेडची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर बंद करण्यात आलेली कोविड केअर सेंटर टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे बेडची संख्या वाढणार असून, रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे.
काही संस्थांना पत्र
गरज भासल्यास खासगी महाविद्यालयाच्या इमारतीतील कोविड केअर सेंटरही सुरू करण्याचे नियोजन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी औंध आयटीआय, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आणि कृषी महाविद्यालय यांना पत्र दिले आहे, असे मुठे यांनी नमूद केले.