खालापूर, (वार्ताहर) – खालापूर तालुक्यातील तांबाटी गावात साईबाबा मंदिराचा 6 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी उत्साहात विविध धार्मिक व समाजप्रबोधनाचे कार्यक्रम झाले.
तांबाटी गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभल्याने या गावात वर्षभर अनेक धार्मिक व समाजप्रबोधनाचे कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ आयोजित करित समाजहिताची जनजागृती करित असतात. साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गावात हरिनामाच्या गजराने नवचैतन्य पसरले होते.
सोहळ्यानिमित्त श्रींचे अभ्यंगस्नान, काकडा आरती, होम हवन, पूजन, साई मध्यान आरती, श्री सत्यनारायण महापूजा, साईंची पालखी मिरवणूक, साई धूप आरती झाली. तसेच सुरताल म्युझिकल ग्रुपचे रुपेशबुवा देशमुख यांनी गायलेली साईचे भजन,
कव्वाली, भावगीत, भक्तीगीत व साई भंडारा (असे विविध धार्मिक, समाजप्रबोधनाचे कार्यक्रम झाले. या सोहळा यशस्वी करण्यासाठी साई श्रध्दा मित्र मंडळ व ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळीनी यांनी परीश्रम घेतले.