लोणावळा, (वार्ताहर) – भारताचे सुपुत्र विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती लोणावळा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह भर उन्हातही दिसून आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास सकाळी मानवंदनेचा कार्यक्रम पार पडला. यानंतर शहरातील विविध भागात असलेल्या बुध्दविहारांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले.
सकाळी ११ नंतर लोणावळा शहर आणि परिसरातील मिरवणुकांना प्रारंभ झाला. शहरातील तापमान उच्चांक गाठणारे असतानाही उन्हात निघालेल्या या मिरवणुकांमध्ये शहरातील आबावृध्दांसोबतच चिमुकले सुध्दा सहभागी झाले होते.
रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य सूर्यकांत वाघमारे, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, निखिल कवीश्वर आदींनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
हिंदू समिती सदस्य, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष विलास बेडेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष नासिरभाई शेख, मनसेचे भरत चिकणे यांच्यासह विविध पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
फालाहार, पाणी, सरबताचे वाटप
लोणावळा शहरातील सिद्धार्थ नगर, तुंगार्ली, वलवण, नांगरगाव, हनुमान टेकडी, खंडाळा, आगवाली चाळ, भुशी, रामनगर या भागासह आजूबाजूच्या परिसरातील कुसगाव, वाकसई, कुरवंडे या ग्रामीण परिसरातून मिरवणुका घेऊन आलेल्या भीमसैनिकांसाठी विविध संघटना तसेच मित्रमंडळांच्या वतीने पाणी,
सरबत, फलाहार तसेच अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. ख्वाजा गरीब नवाज संस्था, साम्यक मित्र परिवार, शंकरबन प्रतिष्ठान, नगरपरिषद कर्मचारी वर्ग यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. संपूर्ण दिवस लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.