वाघोली (पुणे) – वाघोली येथील माजी सैनिक अनिल ज्ञानोबा सातव यांची माजी सैनिक कल्याण संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वाघोली येथे संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सातव यांच्या निवडीसह उपाध्यक्षपदी मारुती कुटे, सचिवपदी आनंद गोसावी यांच्या निवडीसह कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने पुणे शहर एक महत्वाचे ठिकाण राहिले आहे. खेळीमेळीचे असणारे वातावरण पाहता अधिकारी व जवान निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्यास पसंती दर्शवित असतात. पुणे शहराच्या उपनगरांमध्ये माजी सैनिकांची संख्या मोठी आहे. निवृत्तीनंतर माजी सैनिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी माजी सैनिक कल्याण संघटना स्थापन करून अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. सीमेवरील जवानांना राखी पाठविणे, सैनिकांच्या स्मरणार्थ दीपोत्सव, माजी सैनिकांना मदत करणे आदि उपक्रम अनेक वर्षांपासून राबवीत असून यापुढे देखील संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी काम करणार असल्याचे अनिल सातव यांनी सांगितले.