धास्तावलेल्या पालकांमुळे शाळा अद्याप ओसंच

पुणे – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता जवळजवळ पूर्णपणे शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार सोमवारपासून पुणे शहरातील काही शाळांमधील ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मात्र अजुनही बहुतांशी पालक करोनाच्या भीतीने आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी धास्तावलेले दिसत आहेत. त्यामुळे शाळा अजुनही ओसं पडल्या आहेत.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरू करण्यासाठी शाळांनी केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे संमतीपत्र हे दोन घटक आवश्यक आहेत. यानंतरच शाळा सुरू करण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील ५२९ शाळांपैकी केवळ ६६ शाळांना वर्ग भरवण्याची सरकारकडून संमती मिळाली आहे. यामध्ये महापालिकेच्या ४४ तर २२ खासगी शाळांचा समावेश आहे. त्यात पालकांच्या संमतीपत्राच्या अटीमुळे अनेक शाळांचे संमतीपत्र मिळविण्याचे काम सुरू आहे.

याआधी अनेकवेळा शाळा सुरू करण्याचा आदेश काढूनही ते रद्द करण्यात आला होते. आता ठाम निर्णयामुळे अखेर शाळा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. परंतु, सुरू झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या पाहता, अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठीचे संमतीपत्र देण्यास टाळत आहेत. त्यामुळे या पालकांची पसंती ऑनलाईन शिक्षणाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांची शाळेसाठी काय भूमिका आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.