सातारा -येथील दस्तगीर कॉलनीत वाढदिवसाचा केक तलवार, कोयत्याने कापून दहशत माजवणे चांगलेच अंगलट आले आहे. “बर्थ डे बॉय’सह सहा जणांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यातील पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार मोठे कोयते आणि एक तलवार जप्त केली आहे.
पोलिसांनी “बर्थ डे बॉय’ आदिल अस्लम शेख (वय 26) याच्यासह शादाब अय्याज पालकर (वय 20), मिजान निसार चौधरी (वय 30), तोसिफ अजिज कलाल (वय 26), शादाब अस्लम शेख (वय 25, सर्व रा. दस्तगीर कॉलनी) या पाच जणांना अटक केली आहे. तर समीर अस्लम शेख याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दस्तगीर कॉलनीमध्ये एका “बर्थ डे बॉय’ने वाढदिवसादिवशी कोयत्याने केक कापून दहशत पसरवली असल्याची माहिती सातारा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली होती. त्यानुसार शाहुपूरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेस त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. मंगळवार पेठ दस्तगीर कॉलनीमध्ये एक बर्थ डे बॉय व त्याचे इतर मित्रांनी कोयते व तलवारी अशा शस्त्रांचा अवैध साठा केला आहे, अशी माहिती दि. 16 रोजी विशाल वायकर यांना मिळाली. “बर्थ डे बॉय’ने दि. 10 रोजी त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्रांसह दस्तगीर कॉलनीमध्ये कोयत्याने केक कापून दहशत केली आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर वायकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दस्तगीर कॉलनीमध्ये अचानक छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले.
संशयितांनी सातारा शहरात दहशत पसरविण्यासाठी त्यांच्याजवळ चार मोठे कोयते व एक तलवार असा शस्त्रांचा साठा घराजवळ केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. सर्व शस्त्रे जप्त करत पाच जणांना ताब्यात घेतले. एकजण फरारी आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, राहुल चव्हाण व समीर मोरे यांनी ही कारवाई केली. या गुन्हयाचा तपास हवालदार सुनील मोहरे करीत आहेत.