पंढरपूर : राज्यात अपघाताच्या (Accident News) प्रमाणात वाढ झाली आहे. पंढरपूर- कराड रोडवर असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.
कसा घडला अपघात?
भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ येथे हा भीषण अपघात झालाय. यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत. या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्या होत्या. काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर – कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले. आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला. आयशर ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.