Madhya Pradesh – बेघरांना घरे देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र मध्य प्रदेशात या योजनेलाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तयार करण्यात आलेल्या एका घरात चक्क दारूचे दुकान सुरू करण्याचा पराक्रम उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. रायसेन जिल्ह्यातील पठारी गावात हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना समोर आल्यामुळे राज्यात आता बराच गोंधळ सुरू झाला आहे. पीएम आवास योजनेत दारूचे दुकान सुरू करण्याचा परवाना अबकारी विभागाकडूनच जारी करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दारूच्या दुकानांच्या संदर्भात अगोदरच मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार ही दुकाने हाय वेपासून १०० मीटर दूर असली पाहिजेत. दरम्यान, आता या प्रकारानंतर अबकारी विभागाचे अधिकारी संदीप तोमर म्हणाले की पीएम आवासमध्ये दारूचा गुत्ता सुरू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली नव्हती. प्रकार समोर आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवण्यात आली आहे. तपास केल्यानंतरच नेमका काय प्रकार आहे ते स्पष्ट होईल.