मुंबई : ॲड. उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची पुन्हा एकदा सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी दिली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपल्या सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. यानंतर आता पुन्हा एकदा सरकारकडून उज्ज्वल निकम यांची सरकारी वकीलपदी पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसकडून करण्यात आली टीका
उज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. राज्य सरकारने न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून पाप केलं, उज्वल निकम भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना त्यांना सरकारी वकील करून त्यांनी सिद्ध केलं की सरकारी वकीलही भाजपचे राहणार. पण भाजपच्या उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.