बेल्हे – राजुरी येथे पानसरे मळ्यात दोन ठिकाणी झालेल्या चोरीत आठ तोळे सोने व वीस हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळविली आहे. ही घटना बुधवार (दि.17) पहाटेच्या सुमारास घडली आहे.
पहिल्या चोरीत अशोक पंढरीनाथ पानसरे यांच्या घराची कौले काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
पहिल्या खोलीतील कपाटातील आठ तोळ्याचे दागिने व रोख रक्कम दहा हजार रुपये, असा ऐवज लुटला आहे. चोरटे दुसऱ्या खोलीत जात असताना याठिकाणी झोपलेले अशोक पानसरे यांना अचानक जाग आली असता चोरटे पळून गेले. दुसऱ्या ठिकाणी याच मळ्यातील अंजना बाबुराव पानसरे या आजी एकट्या राहत होत्या. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
आवाजाने आजी जाग्या झाल्या असता चोरट्यांनी आजी ओरडू नये म्हणून तोड दाबून धरले. यावेळी चोरट्यांनी कपाट तोडून कपाटातील दहा हजार रुपयांची रक्कम चोरली. आजींच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. घटनास्थळी आळेफाटा पोलीस पोलिसांनी पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.