पुणे : मार्केट यार्डातच शेतीमालाची दुबार विक्री होत आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कमी भाव मिळत आहे. तर दुसरीकडे, ग्राहकांना खिशाला मात्र मोठी झळ बसत आहे. या दुबार विक्री करणाऱ्यांमुळेच कोथिंबिरीचे भाव वाढल्याच्या तक्रारी आल्यानंतर बाजार समितीने आजपासून (मंगळवार दि. १८) कारवाईला सुरूवात केली आहे.
पहिल्या दिवशी चौघांवर कारवाई करत ३३५ जुडी कोथिंबिर जप्त करण्यात आली. या जप्त केलेल्या मालाचा लिलाव करण्यात आला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांचा आदेश, फळ-भाजीपाला विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे यांच्या सुचनेनुसार गटप्रमुख नितीन चौरे, दादासाहेब वरघडे, दीपक धोपटे आणि संतोष कुंभारकर यांनी कारवाई केली.
सुरूवातीला पडलेले कडक ऊन, त्यानंतर मान्सूनपूर्व पाऊसाने हजेरी लावल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाव वाढले आहे. विशेषत: कोथिंबिर ही प्रत्येक घरात लागणारी आहे. या कोथिंबिरीचे भाव घाऊक बाजारातच ५० रुपये जुडीपर्यंत पोहोचले आहेत.
किरकोळ बाजारात तर आणखी चढ्या भावाने विक्री होत आहे. त्यामुळे ग्राहकांना माल महाग मिळत असून, शेतकऱ्यांनाही कमी भाव मिळत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर बाजार समितीने ही कारवाई सुरू केलेली आहे. दरम्यान ही कारवाई सातत्याने केली जाणार असल्याचे विभागप्रमुख बाळासहेब कोंडे यांनी सांगितले.
बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर कोथिंबिरीची दुबार विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीचा व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेता कामा नये. होलसेल आडतदारांना येथील किरकोळ विक्रेत्यांना माल न विकण्याच्या सुचना करण्यात येणार आहे. तरीही विक्री केल्यास अशा आडत्यांवर कारवाई करण्यात येईल. वाढलेला भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
– डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
पालेभाज्यांच्या बाबत राहणार लक्ष
जुन-जुलै महिन्यात दरवर्षी दुबार विक्रीचा प्रश्न ऐरणीवर येतो. विशेषत: त्यामध्ये पालेभाज्यांचा जास्त समावेश असतो. तर काही फळभाज्यांच्या बाबतीतही असे होते. बाजार समिती प्रशासनाकडून वाढलेल्या भाज्यांची दुबार विक्री होते का, याकडे सातत्याने लक्ष् दिले जाणार आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी स्पष्ट केले