अमेरिकी आणि स्थानिक फौजांच्या कारवाईत निष्पाप जीवांचा बळी
जलालाबाद: अफगाणिस्तानात दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यासाठी स्थानिक फौजांच्या कारवाईबरोबरच अमेरिकेकडून हवाई हल्ले केले जातात. मात्र, त्या कारवाईत निष्पाप नागरिकही मृत्युमुखी पडत आहेत. नागरिकांच्या वाढत्या जीवितहानीमुळे अफगाणमध्ये संतापाची भावनाही वाढीस लागली आहे.
अफगाणिस्तानात स्थानिक फौजा आणि अमेरिकी लष्कर 18 वर्षांपासून दहशतवादी संघटनांविरोधात लढत आहे. तालिबानविरोधात तो लढा सुरू झाला. आता इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या खतरनाक संघटनेविरोधातही मोहीम राबवावी लागत आहे.
मात्र, दहशतवाद्यांना लक्ष्य करताना नागरिक मारले जाणार नाहीत याची निश्चिती करण्याचे मोठेच आव्हान सुरक्षा दलांपुढे आहे. अमेरिकी लष्कर आणि अफगाण फौजांच्या कारवाईत मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालामुळे स्पष्ट झाले आहे.
चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सुरक्षा दलांच्या कारवाईत 717 नागरिकांना जीव गमवावा लागला. त्याशिवाय, 680 नागरिक जखमी झाले. ते प्रमाण मागील वर्षापेक्षा 31 टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे, चालू वर्षी लष्करी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या दहशतवादी हल्ल्यांत मारल्या गेलेल्या नागरिकांपेक्षाही अधिक आहे.