स्त्रियांमधील ऍनिमियाची कारणे व उपचार

रक्तक्षयाची कारणे समजली तर उपचार सुलभ

रक्तक्षय अर्थात ऍनिमियाची नेहमी दिसून येणारी कारणे कोणती? यावर विचार केला तर सहज समजून येईल की, आपण आपल्या आहाराकडे किती दिर्लक्ष करतो. म्हणूनच स्त्रियांना रक्तक्षयाच्या सगळ्या कारणांबद्दल माहिती देणेही आवश्‍यक आहे.

  1. आहारात लोह आणि फोलिक ऍसिडचे प्रमाण कमी असणे, गरोदरपणात आणि प्रसूतिनंतर योग्य सप्लिमेंट्‌स न घेणे.
  2. स्त्रियांना प्रसूतिदरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव होणे- यामुळे शरीरातील लोहाचे साठे कमी होतात आणि रक्तक्षय होतो.
  3. पचनसंस्थेशी संबंधित काही आजार उदा. सिलिऍक डिसिज, क्रो डिसिज – यामध्ये लोहाचे शोषण कमी होते.
  4. गरोदरपणात अतिरिक्त उलट्या होणे
  5. गर्भधारणेपूर्वीच रक्तक्षयाने ग्रस्त असणे
  6. एकापेक्षा जास्त गर्भ असणे (उदा. जुळे / तिळे)
  7. दोन गरोदरपणांमध्ये पुरेसे अंतर नसणे
  8. काही प्रकारचे जंतुसंसर्ग उदा. मलेरिया, एच.आय.व्ही.

रक्तक्षयाचे प्रकार
लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय
हा सर्वाधिक आढळून येणारा रक्तक्षयाचा प्रकार असून भारतातले जवळपास 33% पुरुष आणि 89% स्त्रिया या प्रकारच्या रक्तक्षयाने ग्रस्त आहेत. लोह हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे खनिजद्रव्य. हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोहाची आवश्‍यकता असते. हिमोग्लोबिन हे प्रथिन आपल्या फुप्फुसांकडून ऑक्‍सिजन घेऊन शरीरात इतरत्र पोहोचवते. जेव्हा लोहाची कमतरता असते, तेव्हा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन शरीर लवकर थकते आणि प्रतिकारशक्तीदेखील कमी होते. लिव्हर (कलेजा), सोयाबिन, शेंगवर्गीय भाज्या व डाळी यांमध्ये लोह असते.

फोलेटच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय
फोलेट हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असून ते मुख्यत्वे करून प्राणिज पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, डाळी, केळी यांमध्ये आढळते. शरीरात नवीन पेशी आणि रक्तपेशी तयार करण्यासाठीही फोलेट मदत करते. गरोदरपणात शरीरात जास्त प्रमाणात रक्तपेशी तयार कराव्या लागत असल्यामुळे आणि बाळाच्या विकासनासाठी फोलेटची गरज वाढते. त्यामुळेच फोलेटची कमतरता वेगवेगळ्या जन्मजात दोषांशी निगडीत असते. उदा. न्यूरल ट्यूबचा दोष, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे इ.

जीवनसत्व ब-12 च्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय
जीवनसत्व ब- हे सुद्धा लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असते. मुख्यत्वे करून मांसाहारी पदार्थांमधून (चिकन, मटण, मासे इ.) जीवनसत्व ब-12 मिळते. त्यामुळे शाकाहारी व्यक्तींमध्ये या जीवनसत्वाची कमतरता आढळते. गरोदर महिलांमधील ब-12 ची कमतरता न्यूरल ट्यूबचा दोष, आणि मुदतपूर्व प्रसूति यांच्याशी संबंधित असते.

रक्तक्षयाचा प्रतिबंध आणि उपचार
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय काय करायला हवे, हेही समजून घेने गरजेचे आहे. त्यासाठी आहारातील लोहाचे प्रमाण वाढवणे आणि आहारात जीवनसत्व ब-12 व फोलेटचा समतोल साधणे.
1) आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा
या आहारात चिकन, मटण, मासे, अंडी, सुकामेवा व तेलबिया, हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, टोफू असे घटक असणे गरजेचे आहे.
2) आहारात क जीवनसत्वाचा समावेश करावा
आहारात क जीवनसत्वाचा समावेश केल्यास लोहाचे शोषण 4 ते 5 पटींनी वाढते. म्हणजेच सर्वच लिंबूवर्गीय फळे आणि त्यांचे रस, तसेच स्ट्रॉबेरीज, किवी फ्रुट आणि टोमॅटो असणे आवश्‍यक असते.

3) चहाचे सेवन टाळावे
चहामधील टॅनिन नावाचा घटक लोहाचे शोषण कमी करतो. कॅल्शियमचे अतिसेवनदेखील लोहाचे शोषण कमी करते. त्यामुळे ऍनिमिया टाळायचा असेल, तर चहा घेणे थांबवले पाहिजे.
4) आहारात भरपूर द्रवपदार्थ घ्यावे
रोज कमीतकमी 5 लिटर पाणी घेणे चांगले. यामुळे शरीरातील द्रवपदार्थांचे प्रमाण चांगले रहाते, प्रसूतिनंतर रक्तप्रवाह सुधारतो, रक्तात गुठळ्या होण्याची व लघवीच्या जागी जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता कमी होते. लोहाच्या सप्लीमेंट्‌समुळे बद्धकोष्ठता, गॅसेस असे त्रास होऊ शकतात जे पुरेशा द्रवपदार्थांच्या सेवनाने कमी होतात.

5) बद्धकोष्ठता टाळावी
बद्धकोष्ठता हा रक्तक्षयाचा परिणामदेखील आहे. हे टाळण्यासाठी देखील आहारात भरपूर द्रवपदार्थांचा समावेश करावा. तसेच वेळच्यावेळी पोट साफ ठेवावे.
6) पुरेशी विश्रांती घ्यावी
लोहाच्या कमतरतेमुळे जर थकवा येत असेल तर पुरेशी विश्रांती घ्यावी. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने गर्भधारणेपूर्वी आणि नंतर योग्य ती लोह, फोलिक ऍसिड आणि जीवनसत्वे असणारी सप्लीमेंट्‌स घ्यावीत. शाकाहारी व्यक्तींनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने गरज असल्यास जीवनसत्व ब-12 ची सप्लीमेंट्‌स घ्यावीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.