“सरकारची लसीकरणासंदर्भातील रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही”; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हलाख्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. झपाटयाने होणारी रुग्णवाढ आणि मृत्यूंची संख्या सर्वांच्याच चिंतेत भर घालत आहे. संक्रमणाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी विविध राज्यांकडून उपाययोजना केल्या जात असून, केंद्रानेही लसीकरणाला वेग देण्यासाठी परदेशी लसींच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. दरम्यान, केंद्राच्या लसीकरण रणनीतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला गती देण्यासंदर्भात आखलेल्या धोरणावर राहुल गांधींनी टीका केली आहे. राहुल गांधींनी ट्विट केलं असून, “केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगेत लागणार. संपत्ती, आरोग्य आणि जीव गमवणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

यापूर्वी बोलतानाही राहुल गांधींनी लसीकरण धोरणावरून केंद्राला लक्ष्य केलं होतं. “केंद्र सरकारचे लस धोरण भेदाभेद करणारे असून धोरणामध्ये दुर्बल घटकांसाठी लशीची हमी देण्यात आलेली नाही. दुर्बल घटकांना लशीची हमी नाही, केंद्र सरकारची भेदाभेद करणारी रणनीती आहे, वितरणाची रणनीती नाही,” अशा शब्दात राहुल गांधींनी केंद्राला सुनावलं होतं. त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे खापर जनतेवर फोडणारे सरकार सहकार्याची भूमिका घेणार आहे का,” असा सवालही त्यांनी केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.