क्वीन्स क्‍लब टेनिस स्पर्धा : अँडी मरे याचे शानदार पुनरागमन

लंडन – मांडीच्या दुखापतीमुळे पाच महिने स्पर्धात्मक टेनिसपासून दूर असलेल्या अँडी मरे याने क्वीन्स क्‍लब टेनिस स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. तीन वेळा ग्रॅंड स्लॅम विजेतेपद घेणाऱ्या मरे याने स्पेनच्या फेलिसिओ लोपेझ याचा 7-6 (7-5), 6-3 असा पराभव केला.

मरे याला या लढतीमधील पहिल्या सेटमध्ये झुंजावे लागले. लोपेझ याने या सेटमध्ये परतीचे खणखणीत फटके मारले. मात्र टायब्रेकरच्या वेळी त्याला परतीच्या फटक्‍यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा मरे याला मिळाला. हा सेट घेतल्यानंतर मरे याचा आत्मविश्‍वास उंचावला. त्याने दुसऱ्या सेटमध्ये सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत लोपेझ याला फारशी संधी दिली नाही. हा सेट घेत त्याने विजयावर शिक्कामोर्तब केले.

अग्रमानांकित खेळाडू स्टेफिनोस त्सित्सिपास याने पराभवाच्या छायेतून चतुरस्त्र खेळ करीत जेरेमी चार्डी याचा पराभब केला. त्याने हा सामना 4-6, 7-6 (7-0), 7-6 (7-4) असा जिंकला व उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित मरीन चिलीच याने अर्जेन्टिनाच्या दिएगो श्‍वार्टझमन याला 6-4, 6-4 असे पराभूत केले. गतवर्षी चिलीच याने विम्बल्डन स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकाविले होते. विम्बल्डन स्पर्धेत गतवर्षी उपविजेता असलेल्या केविन अँडरसन याने गिलेस सिमोन याच्यावर 6-1, 4-6, 6-4 असा विजय मिळविला. स्टॅनिस्लास वॉवरिंका याला फ्रान्सच्या निकोलस मॅहूट याने 3-6, 7-5, 7-6 (7-2) असा पराभबाचा धक्का दिला. 37 वर्षीय खेळाडू निकोलस याने या स्पर्धेत पात्रता फेरीद्वारे प्रवेश केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)