नीरा (पुणे) – हिवाळ्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असते, त्यामुळे जेजुरी व नीरा पोलिसांनी रात्रगस्त वाढवली आहे. मंगळवारी (दि. 10) पहाटे नीरा पोलीस गस्त घालत असताना मोटारसायकलवर फिरणारे तीघे संशयित हलचाल करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले असता ते मोटारसायकल सोडून पळून गेले. हे तीघेही चोर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नीरा (ता. पुरंदर) पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, रात्रगस्त सुरू असताना राऊंडला नीरा येथील स्मशानभूमी जवळ रात्री दीड ते दोनच्या दरम्यान पोलिस रात्र गस्त घालत असताना नीरा वॉर्ड न.1 येथे तीन जण संशयितरित्या फिरत असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता ते पळून गेले. संशयित मोटारसायकल मिळून आली आहे. टी. व्ही. एस कंपनीची मोटारसायकल (एमएच 42 एजे 5225) ही मोटारसायकल सोडून संशयित चोरटे पळून गेले आहेत. पोलीस हवलदार सुदर्शन होळकर, पोलीस नाईक राजेंद्र भापकर, कॉन्स्टेबल नीलेश जाधव, होमगार्ड तारू व शिंदे यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा अनर्थ टळला.